११ नाममहिमा

मूल (चौपाई)

बंदउँ नाम राम रघुबर को।
हेतु कृसानु भानु हिमकर को॥
बिधि हरि हरमय बेद प्रान सो।
अगुन अनूपम गुन निधान सो॥

अनुवाद (हिन्दी)

मी रघुनाथांच्या ‘राम’ नामाला वंदन करतो. जे अग्नी, सूर्य आणि चंद्र यांचे (‘र’, ‘आ’ व ‘म’ रूपाने) बीज आहे, तसेच जे ब्रह्मदेव, विष्णू आणि शिवरूप आहे, जे वेदांचा प्राण आहे, जे उपमारहित आहे, आणि निर्गुण असून गुणांचे भांडार आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

महामंत्र जोइ जपत महेसू।
कासीं मुकुति हेतु उपदेसू॥
महिमा जासु जान गनराऊ।
प्रथम पूजिअत नाम प्रभाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

‘राम’ हे नाम महामंत्र आहे, स्वतः महेश्वर त्याचा जप करतात. ज्याचा उपदेश काशीमध्ये मुक्तीचे कारण होतो, त्याचा महिमा श्रीगजाननही जाणतो. ‘राम’ या नामाच्या प्रभावामुळे श्री गजाननाची सर्वात प्रथम पूजा होते.॥ २॥

मूल (चौपाई)

जान आदिकबि नाम प्रतापू।
भयउ सुद्ध करि उलटा जापू॥
सहसनाम सम सुनि सिव बानी।
जपि जेईं पिय संग भवानी॥

अनुवाद (हिन्दी)

आदिकवी श्रीवाल्मीकींना रामनामाचा प्रताप कळला. कारण ते नाम उलटे (‘मरा’, ‘मरा’) जपूनही ते पवित्र झाले. एक राम-नाम हे (इतर) सहस्र नामांएवढे आहे, असे शिवांचे वचन ऐकल्यावर पार्वतीही नेहमी आपल्या पतीबरोबर राम-नामाचा जप करीत असते.॥ ३॥

मूल (चौपाई)

हरषे हेतु हेरि हर ही को।
किय भूषन तिय भूषन ती को॥
नाम प्रभाउ जान सिव नीको।
कालकूट फलु दीन्ह अमी को॥

अनुवाद (हिन्दी)

राम-नामाबद्दल पार्वतीच्या मनात इतके प्रेम आहे, असे पाहून शंकरांना हर्ष झाला. त्यांनी स्त्रियांमध्ये भूषण असलेल्या पार्वतीला आपले भूषण-आपले अर्धे अंग-बनविले. नामाचा प्रभाव शिवांना पुरता माहीत आहे. त्यामुळेच कालकूट विषाने त्यांना अमृताचे फल दिले.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

बरषा रितु रघुपति भगति तुलसी सालि सुदास।
राम नाम बर बरन जुग सावन भादव मास॥ १९॥

अनुवाद (हिन्दी)

तुलसीदास म्हणतात की, श्रीरामांची भक्ती हा वर्षा ऋतू आहे. उत्तम भक्त हे धान्य आहेत आणि ‘राम’ या नामातील दोन अक्षरे श्रावण-भाद्रपद मास आहेत. (श्रावण-भाद्रपदातील पावसाने पिक उत्तम यावे, तसे रामनामजपाने रामभक्ती करून भक्त भक्तिसंपन्न होतात.)॥ १९॥

मूल (चौपाई)

आखर मधुर मनोहर दोऊ।
बरन बिलोचन जन जिय जोऊ॥
सुमिरत सुलभ सुखद सब काहू।
लोक लाहु परलोक निबाहू॥

अनुवाद (हिन्दी)

ही दोन अक्षरे मधुर व मनोहर आहेत. ती वर्णमालारूपी शरीराचे दोन नेत्र आहेत, ती (अक्षरे) भक्तांचे जीवन आहेत आणि स्मरण करण्यासाठी सर्वांना सुलभ व आनंदप्रद आहेत. तसेच ती इहलोकी लाभ देतात आणि परलोकी सांभाळ करतात. (अर्थात ती भगवंतांच्या दिव्य धामामध्ये दिव्य देहाने नित्य भगवत्सेवेमध्ये ठेवतात.)॥ १॥

मूल (चौपाई)

कहत सुनत सुमिरत सुठि नीके।
राम लखन सम प्रिय तुलसी के॥
बरनत बरन प्रीति बिलगाती।
ब्रह्म जीव सम सहज सँघाती॥

अनुवाद (हिन्दी)

ही अक्षरे उच्चारण्यास, ऐकण्यास व स्मरण करण्यास फारच सुंदर आहेत. तुलसीदासांना तर ती राम-लक्ष्मणासारखी प्रिय आहेत. त्यांतील ‘र’ व ‘म’ यांचे वेगवेगळे वर्णन केल्याने परस्पर प्रेम दिसून येते. ही जीव व ब्रह्म यांच्यासारखी स्वभावतःच नित्य बरोबर रहातात.॥२॥

मूल (चौपाई)

नर नारायन सरिस सुभ्राता।
जग पालक बिसेषि जन त्राता॥
भगति सुतिय कल करन बिभूषन।
जग हित हेतु बिमल बिधु पूषन॥

अनुवाद (हिन्दी)

दोन्ही अक्षरे ही नर-नारायणाप्रमाणे प्रेमळ भाऊ आहेत. ही जगाचे पालन आणि विशेषतः भक्तांचे रक्षण करणारी आहेत. ही अक्षरे भक्तिरूपी सुंदर स्त्रीच्या कानांतील सुंदर कर्णफुले आहेत आणि जगाचे हित करणारे तेजस्वी चंद्र-सूर्य आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

स्वाद तोष सम सुगति सुधा के।
कमठ सेष सम धर बसुधा के॥
जन मन मंजु कंज मधुकर से।
जीह जसोमति हरि हलधर से॥

अनुवाद (हिन्दी)

ही मोक्षरूप अमृताच्या गोडीसारखी व तृप्तीसारखी आहेत. ती कूर्म व शेषाप्रमाणे पृथ्वीला धारण करणारी आहेत. भक्तांच्या मनरूपी सुंदर कमळात विहार करणाऱ्या भ्रमरांप्रमाणे आहेत. जीभरूपी यशोदेला श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यासारखी (आनंद देणारी) आहेत.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

एकु छत्रु एकु मुकुटमनि सब बरननि पर जोउ।
तुलसी रघुबर नाम के बरन बिराजत दोउ॥ २०॥

अनुवाद (हिन्दी)

तुलसीदास म्हणतात की, श्रीरघुनाथांच्या नावातील दोन्ही अक्षरे अत्यंत श्रेष्ठ आहेत. त्यांतील एक (र कार) छत्ररूपाने (रेफ) आणि दुसरा (मकार) ही मुकुटमणी अनुस्वार ( ं ) रूपाने सर्व अक्षरांच्या डोक्यावर राहतात.॥ २०॥

मूल (चौपाई)

समुझत सरिस नाम अरु नामी।
प्रीति परसपर प्रभु अनुगामी॥
नाम रूप दुइ ईस उपाधी।
अकथ अनादि सुसामुझि साधी॥

अनुवाद (हिन्दी)

तसे पाहिले तर, नाम आणि नामी दोन्ही एकरूपच आहेत, परंतु दोघांमध्ये स्वामी आणि सेवक यांच्याप्रमाणे प्रेम आहे. स्वामीच्या मागे सेवक चालतो,त्याच-प्रमाणे नामामागे नामी चालतो. प्रभू श्रीराम ‘राम’ हे नाम घेताच तेथे येतात. नाम आणि रूप या दोन्ही ईश्वराच्या उपाधी आहेत. ही दोन्ही अनिर्वचनीय आहेत, अनादी आहेत आणि शुद्ध भक्तीने युक्त बुद्धीनेच यांचे स्वरूप जाणले जाते.॥ १॥

मूल (चौपाई)

को बड़ छोट कहत अपराधू।
सुनि गुन भेदु समुझिहहिं साधू॥
देखिअहिं रूप नाम आधीना।
रूप ग्यान नहिं नाम बिहीना॥

अनुवाद (हिन्दी)

यांपैकी कोण मोठे व कोण लहान, हे सांगणे हा अपराध आहे. यांच्या गुणांचे तारतम्य (कमी-जास्तपणा) साधु-पुरुष स्वतःच जाणतात. रूप हे नामाच्या अधीन दिसून येते आणि नामाशिवाय रूपाचे ज्ञान होऊ शकत नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

रूप बिसेष नाम बिनु जानें।
करतल गत न परहिं पहिचानें॥
सुमिरिअ नाम रूप बिनु देखें।
आवत हृदयँ सनेह बिसेषें॥

अनुवाद (हिन्दी)

कोणतेही विशिष्ट रूप हे त्याचे नाम जाणल्याविना अगदी तळहातावर ठेवले तरी ओळखता येणे शक्य नाही आणि रूप पाहिल्याशिवायही नामाचे स्मरण केल्यास विशेष प्रेमासह ते रूप हृदयात प्रकट होते.॥ ३॥

मूल (चौपाई)

नाम रूप गति अकथ कहानी।
समुझत सुखद न परति बखानी॥
अगुन सगुन बिच नाम सुसाखी।
उभय प्रबोधक चतुर दुभाषी॥

अनुवाद (हिन्दी)

नाम व रूप यांच्यातील संबंध सांगता येण्याजोगा नाही. ते समजण्यास सुखदायक आहे, परंतु त्याचे वर्णन करता येत नाही. भगवंतांच्या निर्गुण व सगुण रूपांच्या मध्ये नाम हे सुंदर साक्षीदार आहे आणि दोन्हींचे यथार्थ ज्ञान करविणारे चतुर दुभाषी आहे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

राम नाम मनिदीप धरु जीह देहरीं द्वार।
तुलसी भीतर बाहेरहुँ जौं चाहसि उजिआर॥ २१॥

अनुवाद (हिन्दी)

तुलसीदास म्हणतात की, जर तुम्हांला आत व बाहेर प्रकाश हवा असेल तर तुम्ही मुखरूपी दाराच्या जीभरूपी उंबरठॺावर रामनामरूपी रत्नदीप ठेवा.॥ २१॥

मूल (चौपाई)

नाम जीहँ जपि जागहिं जोगी।
बिरति बिरंचि प्रपंच बियोगी॥
ब्रह्मसुखहि अनुभवहिं अनूपा।
अकथ अनामय नाम न रूपा॥

अनुवाद (हिन्दी)

ब्रह्मदेवाने बनविलेल्या प्रपंचामधून पूर्णपणे सुटलेले वैराग्यवान, मुक्त योगी पुरुष हे नाव जिभेने जपत (तत्त्वज्ञानरूपी दिवसामध्ये) जागतात आणि नाम-रूपाने रहित असे अनुपम, अनिर्वचनीय,अनामय ब्रह्मसुख अनुभवतात.॥ १॥

मूल (चौपाई)

जाना चहहिं गूढ़ गति जेऊ।
नाम जीहँ जपि जानहिं तेऊ॥
साधक नाम जपहिं लय लाएँ।
होहिं सिद्ध अनिमादिक पाएँ॥

अनुवाद (हिन्दी)

जे परमात्म्याचा यथार्थ महिमा जाणू इच्छितात, ते सुद्धा जिभेने नामाचा जप करून ते जाणून घेतात. (लौकिक सिद्धी प्राप्त करू इच्छिणारे अर्थार्थी) साधक मन लावून नामाचा जप करतात आणि अणिमादी (अष्ट) सिद्धी प्राप्त करून सिद्ध बनतात.॥ २॥

मूल (चौपाई)

जपहिं नामु जन आरत भारी।
मिटहिं कुसंकट होहिं सुखारी॥
राम भगत जग चारि प्रकारा।
सुकृती चारिउ अनघ उदारा॥

अनुवाद (हिन्दी)

आर्त (संकटग्रस्त) भक्त नामजप करतात, तेव्हा त्यांची मोठ-मोठी संकटे नाहीशी होतात आणि ते सुखी होतात. जगात चार प्रकारचे [(१) अर्थार्थी—द्रव्यादीच्या इच्छेने भजणारे, (२) आर्त—संकटातून सुटका करून घेण्यासाठी भजणारे, (३) जिज्ञासू—भगवंतांना जाणून घेण्याच्या इच्छेने भजणारे, (४) ज्ञानी—भगवंतांना तत्त्वतः जाणून स्वाभाविक प्रेमाने भजणारे] रामभक्त आहेत आणि हे चारी पुण्यात्मे, पापरहित आणि उदार आहेत.॥ ३॥

मूल (चौपाई)

चहू चतुर कहुँ नाम अधारा।
ग्यानी प्रभुहि बिसेषि पिआरा॥
चहुँ जुग चहुँ श्रुति नाम प्रभाऊ।
कलि बिसेषि नहिं आन उपाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

चारही चतुर भक्तांना नामाचाच आधार आहे. यांपैकी ज्ञानी भक्त हा प्रभूला विशेष आवडतो. तसे पाहिले तर चारी युगांमध्ये आणि चारी वेदांमध्ये नामाचा प्रभाव आहे, परंतु कलियुगामध्ये तो विशेष आहे. या युगामध्ये नामाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सकल कामना हीन जे राम भगति रस लीन।
नाम सुप्रेम पियूष ह्रद तिन्हहुँ किए मन मीन॥ २२॥

अनुवाद (हिन्दी)

जे सर्व प्रकारच्या (भोग व मोक्षाच्यासुद्धा) कामनेंनी रहित असतात व श्रीरामभक्तीच्या रसामध्ये मग्न असतात, त्यांनी सुद्धा नामाच्या सुंदर प्रेमरूपी अमृत-सरोवरात आपले मन मासा बनवून ठेवले आहे. (अर्थात ते नामरूपी अमृतापासून क्षणभरही दूर होऊ इच्छित नाहीत.)॥ २२॥

मूल (चौपाई)

अगुन सगुन दुइ ब्रह्म सरूपा।
अकथ अगाध अनादि अनूपा॥
मोंरें मत बड़ नामु दुहू तें।
किए जेहिं जुग निज बस निज बूतें॥

अनुवाद (हिन्दी)

निर्गुण व सगुण ही ब्रह्माची दोन स्वरूपे आहेत. दोन्हीही सांगता न येणारी, अथांग, अनादी व अनुपम आहेत. माझ्या मते ‘नाम’ हे दोन्ही रूपांपेक्षा मोठे आहे. कारण त्याने आपल्या शक्तीने (सगुण-निर्गुण) दोघांनाही आपल्या अधीन करून ठेवले आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

प्रौढ़ि सुजन जनिजानहिंजन की।
कहउँ प्रतीति प्रीति रुचि मन की॥
एकु दारुगत देखिअ एकू।
पावक सम जुग ब्रह्म बिबेकू॥
उभय अगम जुग सुगम नाम तें।
कहेउँ नामु बड़ ब्रह्म राम तें॥
ब्यापकु एकु ब्रह्म अबिनासी।
सत चेतन घन आनँद रासी॥

अनुवाद (हिन्दी)

सज्जनांनी या गोष्टीला मज दासाचे धार्ष्टॺ किंवा निव्वळ काव्योक्ती समजू नये. मी माझ्या मनातील विश्वास, प्रेम आणि आवडीची गोष्ट सांगत आहे. (निर्गुण व सगुण) या दोन्ही प्रकारच्या ब्रह्माचे ज्ञान हे अग्निप्रमाणे आहे. निर्गुण ह्या काष्ठामधील अग्निप्रमाणे न दिसणारे आणि सगुण हे प्रत्यक्ष दिसणाऱ्या अग्निप्रमाणे आहे. दोन्हीही जाणण्यास कठीण आहेत, परंतु नामामुळे ती सुगम बनतात. म्हणूनच मी नामाला (निर्गुण) ब्रह्मापेक्षा आणि (सगुण) रामापेक्षा मोठे असे म्हटले आहे. ब्रह्म हे व्यापक, एक, अविनाशी व सच्चिदानंदघन आहे.॥ २-३॥

मूल (चौपाई)

अस प्रभु हृदयँ अछत अबिकारी।
सकल जीव जग दीन दुखारी॥
नाम निरूपन नाम जतन तें।
सोउ प्रगटत जिमि मोल रतन तें॥

अनुवाद (हिन्दी)

असे विकाररहित प्रभू हृदयात रहात असूनही जगातील सर्व जीव हे दीन आणि दुःखी आहेत. नामाचे यथार्थ स्वरूप, महिमा, रहस्य व प्रभाव जाणून श्रद्धेने नामजपरूपी साधन केल्यामुळे ज्याप्रमाणे रत्न जाणण्यामुळे त्याचे मूल्य कळते, तसेच ब्रह्म ज्ञात (प्रगट) होते.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

निरगुन तें एहि भाँति बड़ नाम प्रभाउ अपार।
कहउँ नामु बड़ राम तें निज बिचार अनुसार॥ २३॥

अनुवाद (हिन्दी)

अशारीतीने निर्गुणापेक्षा नामाचा प्रभाव फार मोठा आहे. आता मी माझे मत सांगतो की, नाम हे (सगुण) रामापेक्षाही मोठे आहे.॥ २३॥

मूल (चौपाई)

राम भगत हित नर तनु धारी।
सहि संकट किए साधु सुखारी॥
नामु सप्रेमजपत अनयासा।
भगत होहिं मुद मंगल बासा॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांनी भक्तांच्या कल्याणासाठी मनुष्यशरीर धारण करून व स्वतः कष्ट सहन करून साधूंना सुखी केले, परंतु भक्तजन प्रेमाने त्यांच्या नामाचा जप करीत सहजपणे आनंद आणि कल्याण यांचे निवासस्थान बनून जातात.॥ १॥

मूल (चौपाई)

राम एक तापस तिय तारी।
नाम कोटि खल कुमति सुधारी॥
रिषि हित राम सुकेतुसुता की।
सहित सेन सुत कीन्हि बिबाकी॥
सहित दोष दुख दास दुरासा।
दलइ नामु जिमि रबि निसि नासा॥
भंजेउरामआपु भव चापू।
भव भय भंजन नाम प्रतापू॥

अनुवाद (हिन्दी)

(हेच पहाना!) श्रीरामांनी केवळ एका मुनीच्या पत्नीचा (अहल्येचा) उद्धार केला, परंतु नामाने कोटॺवधी दुष्टांची बिघडलेली बुद्धीसुधारली. श्रीरामांनी विश्वामित्र ऋषींच्यासाठी सुकेतू यक्षाची कन्या ताडका हिचा, सेना आणि तिचा पुत्र (सुबाहू) यांच्यासह नाश केला. परंतु नाम हे आपल्या भक्तांचे दोष, दुःख आणि दुष्ट वासना यांचा असा नाश करते, जसा सूर्य रात्रीचा नाश करतो. श्रीरामांनी स्वतः (एक) शिव-धनुष्य मोडून टाकले, परंतु नामाचा प्रतापच संसारातील सर्व भयांचा नाश करणारा आहे.॥ २-३॥

मूल (चौपाई)

दंडक बनु प्रभु कीन्ह सुहावन।
जन मन अमित नाम किए पावन॥
निसिचर निकर दले रघुनंदन।
नामु सकल कलि कलुष निकंदन॥

अनुवाद (हिन्दी)

प्रभू श्रीरामांनी (भयानक) दंडकवन शोभिवंत करून टाकले, परंतु नामाने असंख्य मनुष्यांची मने पवित्र केली. श्रीरघुनाथांनी राक्षसांच्या सेना मारून टाकल्या, परंतु नाम तर कलियुगातील सर्व पापांचे मूळच उपटून टाकणारे आहे.॥ ४॥

दोहा

मूल (दोहा)

सबरी गीध सुसेवकनि सुगति दीन्हि रघुनाथ।
नाम उधारे अमित खल बेद बिदित गुन गाथ॥ २४॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरघुनाथांनी शबरी, जटायू इत्यादी उत्तम सेवकांनाच मुक्ती दिली, परंतु नामाने असंख्य दुष्टांचा उद्धार केला. नामाच्या गुणांच्या कथा वेदांमध्ये प्रसिद्ध आहेत.॥ २४॥

मूल (चौपाई)

राम सुकंठ बिभीषन दोऊ।
राखे सरन जान सबु कोऊ॥
नाम गरीब अनेक नेवाजे।
लोक बेद बर बिरिद बिराजे॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांनी सुग्रीव, बिभीषण या दोघांनाच आपला आश्रय दिला, हे सर्वजणांना ठाऊक आहे, परंतु नामाने अनेक गरिबांच्यावर कृपा केली आहे. नामाचे सुंदर महात्म्य लोकांमध्ये आणि वेदांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.॥ १॥

मूल (चौपाई)

राम भालु कपि कटकु बटोरा।
सेतु हेतु श्रमु कीन्ह न थोरा॥
नामु लेत भवसिंधु सुखाहीं।
करहु बिचारु सुजन मन माहीं॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांनी अस्वले आणि वानर यांची सेना एकत्र केली आणि समुद्रावर पूल बांधण्यासाठी काही कमी कष्ट घेतले नाहीत, परंतु नाम घेताच भवसागर आटून जातो. सज्जनांनो, मनात विचार करा. (की, दोघांमध्ये कोण मोठे आहे.)॥ २॥

मूल (चौपाई)

राम सकुल रन रावनु मारा।
सीय सहित निज पुर पगु धारा॥
राजा रामु अवध रजधानी।
गावत गुन सुर मुनि बर बानी॥
सेवक सुमिरत नामु सप्रीती।
बिनु श्रम प्रबल मोह दलु जीती॥
फिरतसनेहँ मगन सुख अपनें।
नाम प्रसाद सोच नहिं सपनें॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांनी युद्धामध्ये रावणाला परिवारासह मारले. नंतर सीतेसह आपल्या नगरात प्रवेश केला. प्रभू राम हे राजा झाले, अयोध्या ही त्यांची राजधानी झाली. देव आणि मुनी सुंदर वाणीने त्यांचे गुण गातात. परंतु सेवक (भक्त) प्रेमाने नामाचे फक्त स्मरण करताच, विनासायास मोहाच्या प्रबळ सेनेला जिंकून व प्रेमात मग्न होऊन आत्म-सुखात रममाण होतात. नामाच्या प्रसादामुळे त्यांना स्वप्नातही कोणती काळजी सतावीत नाही.॥ ३-४॥

दोहा

मूल (दोहा)

ब्रह्म राम तें नामु बड़ बर दायक बर दानि।
रामचरित सत कोटि महँ लिय महेस जियँ जानि॥ २५॥

अनुवाद (हिन्दी)

अशाप्रकारे नाम हे निर्गुण ब्रह्म आणि सगुण श्रीराम यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे नाम वरदान देणाऱ्यांनाही वर देणारे आहे. श्रीशंकरांनी आपल्या मनात हे जाणून शतकोटी रामचरित्रांमधून या ‘राम’ नामाला (साररूपाने निवडून) ग्रहण केले आहे.॥ २५॥