१० श्रीसीताराम-धामवंदना

मूल (चौपाई)

बंदउँ अवध पुरी अति पावनि।
सरजू सरि कलि कलुष नसावनि॥
प्रनवउँ पुर नर नारि बहोरी।
ममता जिन्ह पर प्रभुहि न थोरी॥

अनुवाद (हिन्दी)

मी अत्यंत पवित्र अशा अयोध्यापुरीला आणि कलियुगातील पापांचा नाश करणाऱ्या शरयूनदीला वंदन करतो. नंतर मीे ज्यांच्यावर प्रभू श्रीरामांनी अपरंपार ममता केली, त्या अयोध्येतील नरनारींना मी वंदन करतो.॥ १॥

मूल (चौपाई)

सियनिंदक अघ ओघ नसाए।
लोक बिसोक बनाइ बसाए॥
बंदउँ कौसल्या दिसि प्राची।
कीरति जासु सकल जग माची॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामांनी सीतामाईंची निंदा करणाऱ्यांच्याही पाप-राशींचा नाश करून, त्यांना शोकरहित केले व त्यांना आपल्या लोकी नेले. तसेच जिची कीर्ती संपूर्ण जगात पसरली आहे, अशा कौसल्यारूपी पूर्व दिशेला मी वंदन करतो.॥ २॥

मूल (चौपाई)

प्रगटेउ जहँ रघुपति ससि चारू।
बिस्व सुखद खल कमल तुसारू॥
दसरथ राउ सहित सब रानी।
सुकृत सुमंगल मूरति मानी॥
करउँ प्रनाम करम मन बानी।
करहु कृपा सुत सेवक जानी॥
जिन्हहि बिरचि बड़ भयउ बिधाता।
महिमा अवधि राम पितु माता॥

अनुवाद (हिन्दी)

जेथून (कौसल्यारूपी पूर्व दिशेतून) विश्वाला सुख देणारा आणि दुष्टरूपी कमळांचा कडाक्याच्या थंडीप्रमाणे नाश करणारा श्रीरामचंद्ररूपी सुंदर चंद्र उगवला, त्या सर्व राण्यांसह राजा दशरथांना पुण्य व सुंदर कल्याणाची मूर्ती मानून मी काया-वाचा-मनाने प्रणाम करतो. त्यांनी आपल्या पुत्राचा सेवक समजून मजवर कृपा करावी. त्यांना निर्माण करून ब्रह्मदेवाने मोठेपणा मिळविला. ते श्रीरामांचे माता-पिताअसल्याने त्यांचा महिमा अगाध आहे.॥ ३-४॥

सोरठा

मूल (दोहा)

बंदउँ अवध भुआल सत्य प्रेम जेहि राम पद।
बिछुरत दीनदयाल प्रिय तनु तृन इव परिहरेउ॥ १६॥

अनुवाद (हिन्दी)

मी अयोध्येचा राजा दशरथ यांना वंदन करतो, ज्यांचे श्रीरामांच्या चरणी खरेखुरे प्रेम होते. इतके की, दीनदयाळू श्रीरामांचा वियोग होताच त्यांनी आपले प्रिय शरीर तुच्छ कस्पटाप्रमाणे फेकून दिले.॥

मूल (चौपाई)

प्रनवउँ परिजन सहित बिदेहू।
जाहि राम पद गूढ़ सनेहू॥
जोग भोग महँ राखेउ गोई।
राम बिलोकत प्रगटेउ सोई॥

अनुवाद (हिन्दी)

कुटुंबासह राजा जनकांनाही मी प्रणाम करतो. त्यांच्या मनात श्रीरामांच्या चरणी गूढ प्रेम भरले होते. पण त्यांनी ते योग व भोग यांमध्ये दडवून ठेवले होते, परंतु श्रीरामांना पाहताच ते उचंबळून आले.॥ १॥

मूल (चौपाई)

प्रनवउँ प्रथम भरत के चरना।
जासु नेम ब्रत जाइ न बरना॥
राम चरन पंकज मन जासू।
लुबुध मधुप इव तजइ न पासू॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वांत प्रथम मी भरताच्या चरणी प्रणाम करतो. कारण त्याचे नियम व व्रते यांचे वर्णनही करता येणार नाही. शिवाय श्रीरामांच्या चरणकमलांमध्ये भ्रमराप्रमाणे लुब्ध झालेले त्याचे मन त्यांच्यापासून दूर जात नसे.॥ २॥

मूल (चौपाई)

बंदउँ लछिमन पद जलजाता।
सीतल सुभग भगत सुखदाता॥
रघुपति कीरति बिमल पताका।
दंड समान भयउ जस जाका॥

अनुवाद (हिन्दी)

नंतर मी लक्ष्मणाच्या चरण-कमलांना वंदन करतो, जी चरण-कमले शीतल, सुंदर व भक्तांना सुखदायी आहेत. श्रीरघुनाथांच्या कीर्तीरूपी विमल ध्वजामध्ये ज्यांची कीर्ती ही (ध्वज उंच फडकविणाऱ्या) दंडासारखी आहे.॥ ३॥

मूल (चौपाई)

सेष सहस्रसीस जग कारन।
जो अवतरेउ भूमि भय टारन॥
सदा सो सानुकूल रह मो पर।
कृपासिंधु सौमित्रि गुनाकर॥

अनुवाद (हिन्दी)

सहस्र शिरे असणारा जो शेष जगाचे कारण आहे व ज्याने पृथ्वीेचे भय नाहीसे करण्यासाठी अवतार घेतला, तो गुणांची खाण असलेला कृपासिंधू सुमित्रानंदन लक्ष्मण माझ्यावर नेहमी प्रसन्न राहो.॥ ४॥

मूल (चौपाई)

रिपुसूदन पद कमल नमामी।
सूर सुसील भरत अनुगामी॥
महाबीर बिनवउँ हनुमाना।
राम जासु जस आप बखाना॥

अनुवाद (हिन्दी)

त्यानंतर मी शत्रुघ्नाच्या चरण-कमलांना प्रणाम करतो. तो महान वीर, सुशील आणि भरताचा अनुयायी आहे. मी त्या महावीर हनुमानालाही विनंती करतो की, ज्याच्या कीर्तीचे वर्णन स्वतः श्रीरामचंद्रांनी (आपल्या मुखाने) केलेले आहे.॥ ५॥

सोरठा

मूल (दोहा)

प्रनवउँ पवनकुमार खल बन पावक ग्यान घन।
जासु हृदय आगार बसहिं राम सर चाप धर॥ १७॥

अनुवाद (हिन्दी)

त्या वायुसुत श्रीहनुमानालाही मी प्रणाम करतो, जो दुष्टरूपी वनाला भस्म करणारा अग्नी आहे. तसेच जो ज्ञानघन असून ज्याच्या हृदयमंदिरात धनुष्य-बाण धारण केलेले श्रीराम निवास करतात.॥ १७॥

मूल (चौपाई)

कपिपति रीछ निसाचर राजा।
अंगदादि जे कीस समाजा॥
बंदउँ सब के चरन सुहाए।
अधम सरीर राम जिन्ह पाए॥

अनुवाद (हिन्दी)

वानरांचा राजा सुग्रीव, अस्वलांचा राजा जांबवान, राक्षसांचा राजा बिभीषण आणि अंगद इत्यादी जितका म्हणून वानरांचा समाज आहे, ज्यांनी अधम (पशू आणि राक्षस इत्यादी) शरीरामध्ये जन्मूनही श्रीरामांना प्राप्त करून घेतले, त्या सर्वांच्या चरणांना मी वंदन करतो.॥ १॥

मूल (चौपाई)

रघुपति चरन उपासक जेते।
खग मृग सुर नर असुर समेते॥
बंदउँ पद सरोज सब केरे।
जे बिनु काम राम के चेरे॥

अनुवाद (हिन्दी)

पशू, पक्षी, देव, मनुष्य, असुर यांच्यासह जितके म्हणून श्रीरामांच्या चरणांचे उपासक व निष्काम सेवक आहेत, त्या सर्वांच्या चरण-कमलांना मी वंदन करतो.॥ २॥

मूल (चौपाई)

सुक सनकादि भगत मुनि नारद।
जे मुनिबर बिग्यान बिसारद॥
प्रनवउँ सबहि धरनि धरि सीसा।
करहु कृपा जन जानि मुनीसा॥

अनुवाद (हिन्दी)

शुकदेव, सनकादी, नारदमुनी इत्यादी जितके भक्त आणि परमज्ञानी श्रेष्ठ मुनी आहेत, त्या सर्वांना मी भूमीवर मस्तक टेकून प्रणाम करतो. हे मुनीश्वरांनो! तुम्ही सर्वजण मला आपला दास समजून माझ्यावर कृपा करा.॥ ३॥

मूल (चौपाई)

जनकसुता जग जननि जानकी।
अतिसय प्रिय करुनानिधान की॥
ताके जुग पद कमल मनावउँ।
जासु कृपाँ निरमल मति पावउँ॥

अनुवाद (हिन्दी)

राजा जनकांची कन्या, जगन्माता आणि करुणानिधान श्रीरामांची प्रियतमा असलेल्याजानकीमातेच्या दोन्ही चरण-कमलांना मी आळवितो की, त्यांच्या कृपेमुळे निर्मळ बुद्धी मला मिळावी.॥ ४॥

मूल (चौपाई)

पुनि मन बचन कर्म रघुनायक।
चरन कमल बंदउँ सब लायक॥
राजिवनयन धरें धनु सायक।
भगत बिपति भंजन सुखदायक॥

अनुवाद (हिन्दी)

त्यानंतर मी कमलनयन, धनुष्य-बाण धारण करणाऱ्या, भक्तांची संकटे दूर करणाऱ्या व सर्वांना सुख देणाऱ्या श्रीरामांच्या सर्वसमर्थ चरणकमलांना कायावाचामनाने वंदन करतो.॥ ५॥

दोहा

मूल (दोहा)

गिरा अरथ जल बीचि सम कहिअत भिन्न न भिन्न।
बंदउँ सीता राम पद जिन्हहि परम प्रिय खिन्न॥ १८॥

अनुवाद (हिन्दी)

जसे वाणी व तिचा अर्थ, तसेच जल व तरंग यांच्यासारखे सांगण्यापुरते भिन्न आहेत, परंतु वास्तविक एकरूप आहेत, तसेच जे दीनदयाळू आहेत, त्या श्रीसीतारामांच्या चरणांना मी वंदन करतो.॥ १८॥