०९ वाल्मीकि, वेद, ब्रह्मदेव, देवता, शिव, पार्वती इत्यादींना वंदन

सोरठा

मूल (दोहा)

बंदउँ मुनि पद कंजु रामायन जेहिं निरमयउ।
सखर सुकोमल मंजु दोष रहित दूषन सहित॥ १४(घ)॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांनी रामायण रचले, त्या वाल्मीकी मुनींच्या चरणकमलांना मी वंदन करतो. त्यांची ही रचना खर (राक्षस) सहित असली, तरी ती खर (कठोर) नसून कोमल व सुंदर आहे. तसेच ती दूषण (राक्षस) सहित असली तरी दूषण (दोष) रहित आहे.॥ १४ (घ)॥

मूल (दोहा)

बंदउँ चारिउ बेद भव बारिधि बोहित सरिस।
जिन्हहि न सपनेहुँ खेद बरनत रघुबर बिसद जसु॥ १४(ङ)॥

अनुवाद (हिन्दी)

जे संसारसागरातून पैलतीराला जाण्यासाठी नावेसारखे आहेत, त्या चारही वेदांना मी वंदन करतो. या वेदांना श्रीरामांच्या निर्मल यशाचे वर्णन करता करता आपण थकून जाऊ, असे स्वप्नातही वाटत नाही. (त्या वर्णनात वेद नेहमीच उत्साही असतात.)॥ १४ (ङ)॥

दोहा

मूल (दोहा)

बंदउँ बिधि पद रेनु भव सागर जेहिं कीन्ह जहँ।
संत सुधा ससि धेनु प्रगटे खल बिष बारुनी॥ १४(च)॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांनी हा भव-सागर बनविला, ज्याच्या एका बाजूला संतरूपी अमृत, चंद्रमा व कामधेनू निघाले आणि दुसऱ्या बाजूला दुष्ट मनुष्यरूपी विष आणि मदिरा उत्पन्न झाली, त्या ब्रह्मदेवांच्या चरण धुळीला मी वंदन करतो.॥

दोहा

मूल (दोहा)

बिबुध बिप्र बुध ग्रह चरन बंदि कहउँ कर जोरि।
होइ प्रसन्न पुरवहु सकल मंजु मनोरथ मोरि॥ १४(छ)॥

अनुवाद (हिन्दी)

देव, ब्राह्मण, पंडित व ग्रह या सर्वांच्या चरणी वंदन करून, हात जोडून मी विनवितो की, तुम्ही सर्वांनी प्रसन्न होऊन माझे सर्व उत्तम मनोरथ पूर्ण करा.॥ १४(छ)॥

मूल (चौपाई)

पुनि बंदउँ सारद सुरसरिता।
जुगल पुनीत मनोहर चरिता॥
मज्जन पान पाप हर एका।
कहत सुनत एक हर अबिबेका॥

अनुवाद (हिन्दी)

त्यानंतर मी सरस्वती व गंगा यांना वंदन करतो. दोघीही पवित्र व मनोहर चरित्राच्या आहेत. एक (गंगा) स्नान केल्याने व पाणी प्याल्याने पापांचे हरण करते, तर दुसरी (सरस्वती) हिचे गुण व कीर्ती कथन केल्याने आणि श्रवण केल्याने अज्ञानाचा नाश करते.॥ १॥

मूल (चौपाई)

गुर पितु मातु महेस भवानी।
प्रनवउँ दीनबंधु दिन दानी॥
सेवक स्वामि सखा सिय पी के।
हित निरुपधि सब बिधि तुलसी के॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीमहेश व पार्वतीला मी प्रणाम करतो. ते माझे गुरू व माता-पिता आहेत, ते दीनबंधू व नित्य दान करणारे आहेत. ते सीतापती श्रीरामचंद्रांचे सेवक, स्वामी व सखा आहेत. तसेच मज तुलसीदासाचे सर्व प्रकारे खरे हित करणारे आहेत.॥ २॥

मूल (चौपाई)

कलि बिलोकि जग हित हर गिरिजा।
साबर मंत्र जाल जिन्ह सिरिजा॥
अनमिल आखर अरथ न जापू।
प्रगट प्रभाउ महेस प्रतापू॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांनी कलियुगाचा प्रभाव पाहून जगाच्या हितासाठी शाबर-मंत्रसमूह रचले, ज्या मंत्रांच्या अक्षरांचा मेळ बसत नाही, नीट अर्थ लागत नाही व जपसुद्धा होत नाही, परंतु श्रीशिवांच्या प्रभावाने त्यांचा प्रत्यक्ष परिणाम मात्र दिसून येतो.॥ ३॥

मूल (चौपाई)

सो उमेस मोहि पर अनुकूला।
करिहिं कथा मुद मंगल मूला॥
सुमिरि सिवा सिव पाइ पसाऊ।
बरनउँ रामचरित चित चाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

ते उमेश माझ्यावर प्रसन्न होऊन, (श्रीरामांची) ही कथा आनंद आणि मंगल यांचे मूळ बनवितील. अशा प्रकारे पार्वती आणि शिव या दोघांचे स्मरण करून आणि त्यांचा प्रसाद मिळवून मी मोठॺा आवडीने श्रीरामचरित्राचे वर्णन करतो.॥ ४॥

मूल (चौपाई)

भनिति मोरि सिव कृपाँ बिभाती।
ससि समाज मिलि मनहुँ सुराती॥
जे एहि कथहि सनेह समेता।
कहिहहिं सुनिहहिं समुझि सचेता॥
होइहहिं राम चरन अनुरागी।
कलि मल रहित सुमंगल भागी॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे तारागणांसह चंद्राबरोबर रात्र शोभते, त्याप्रमाणे माझी कविता श्रीशंकरांच्या कृपेमुळे शोभून दिसेल. जे ही कथा प्रेमाने व एकाग्रतेने समजून-उमजून वर्णन करतील किंवा ऐकतील, ते कलियुगाच्या पापांनी रहित होतील आणि सुंदर कल्याणाची प्राप्ती करून श्रीरामांच्या चरणांचे भक्त बनतील.॥ ५-६॥

दोहा

मूल (दोहा)

सपनेहुँ साचेहुँ मोहि पर जौं हर गौरि पसाउ।
तौ फुर होउ जो कहेउँ सब भाषा भनिति प्रभाउ॥ १५॥

अनुवाद (हिन्दी)

जर माझ्यावर श्रीशिव-पार्वती यांची स्वप्नातही खरोखर प्रसन्नता झाली, तर मी या प्राकृत भाषेतील कवितेचा जो प्रभाव सांगितला आहे, तो सर्व खरा होईल.॥ १५॥