०५ संत-असंत-वंदना

मूल (चौपाई)

बंदउँ संत असज्जन चरना।
दुखप्रद उभय बीच कछु बरना॥
बिछुरत एक प्रान हरि लेहीं।
मिलत एक दुख दारुन देहीं॥

अनुवाद (हिन्दी)

(आता) मी संत व दुष्ट दोघांच्या चरणांना वंदन करतो. दोघेही दुःख देणारे आहेत. परंतु त्यांच्यामध्ये मोठा फरक आहे. तो असा की, संत वियोगाने प्राणहरणाचे दुःख देतात आणि दुष्ट भेटण्याने दारुण दुःख देतात.॥ २॥

मूल (चौपाई)

उपजहिं एक संग जग माहीं।
जलज जोंक जिमि गुन बिलगाहीं॥
सुधा सुरा सम साधु असाधू।
जनक एक जग जलधि अगाधू॥

अनुवाद (हिन्दी)

जगामध्ये दोघेही बरोबरच उत्पन्न होतात. परंतु एकाच जागी उत्पन्न होणाऱ्या कमळ व जळूप्रमाणे त्यांचे गुण भिन्न असतात. (कमळ हे दर्शनाने व स्पर्शाने सुख देते, तर जळू स्पर्श होताच रक्त शोषू लागते.) साधू हा अमृतासारखा (मृत्युरूपी संसारातून उद्धार करणारा) असतो, तर दुष्ट मदिरेसारखा (मोह, प्रमाद आणि जडता उत्पन्न करणारा) असतो. दोघांना उत्पन्न करणारा जगरूपी अगाध समुद्र एकच आहे. (जसे एकाच समुद्रातून अमृत आणि मदिरा दोन्हींची उत्पत्ती झाली आहे.)॥ ३॥

मूल (चौपाई)

भलअनभल निज निज करतूती।
लहत सुजस अपलोक बिभूती॥
सुधा सुधाकर सुरसरि साधू।
गरल अनल कलिमल सरि ब्याधू॥
गुन अवगुन जानत सब कोई।
जो जेहि भाव नीक तेहि सोई॥

अनुवाद (हिन्दी)

चांगले व वाईट हे आपापल्या करणीप्रमाणे सुंदर कीर्ती किंवा अपकीर्तीची जोड करतात. साधूंचा स्वभाव अमृत, चंद्र व गंगा यांच्याप्रमाणे असतो तर दुष्टांचा स्वभाव विष, अग्नी व कर्मनाशा (या कलियुगातील पापांच्या) नदीप्रमाणे असतो. यांचे गुण-अवगुण सर्वजण जाणतात. परंतु ज्याला जे आवडते, त्याला तेच बरे वाटते.॥ ४-५॥

दोहा

मूल (दोहा)

भलो भलाइहि पै लहइ लहइ निचाइहि नीचु।
सुधा सराहिअ अमरताँ गरल सराहिअ मीचु॥ ५॥

अनुवाद (हिन्दी)

चांगला माणूस चांगलेच घेतो आणि नीच माणूस वाईटच ग्रहण करतो. अमृताची थोरवी अमर करण्यामध्ये असते, तर विषाची मारून टाकण्यामध्ये.॥ ५॥

मूल (चौपाई)

खल अघ अगुन साधु गुन गाहा।
उभय अपार उदधि अवगाहा॥
तेहि तें कछु गुन दोष बखाने।
संग्रह त्याग न बिनु पहिचाने॥

अनुवाद (हिन्दी)

दुष्ट लोकांच्या पापांच्या व अवगुणांच्या कथा तसेच साधूंच्या गुणांच्या कथा या दोन्ही अपार व अथांग समुद्राप्रमाणे आहेत. त्यामुळे (येथे)काही गुणांचे वा दोषांचे वर्णन केलेले आहे. कारण ते ओळखून घेतल्याशिवाय गुणांचे ग्रहण करता येत नाही किंवा दोषांचा त्यागही करता येत नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

भलेउ पोच सब बिधि उपजाए।
गनि गुन दोष बेद बिलगाए॥
कहहिं बेद इतिहास पुराना।
बिधि प्रपंचु गुन अवगुन साना॥

अनुवाद (हिन्दी)

चांगले-वाईट हे सर्वच ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेले आहे, परंतु गुण आणि दोषांचा विचार करून वेदांनी त्यांना वेगवेगळे केले आहे. वेद, इतिहास व पुराणे असे म्हणतात की, हि सृष्टी गुण-अवगुणांनी भरलेली आहे.॥ २॥

मूल (चौपाई)

दुख सुख पाप पुन्य दिन राती।
साधु असाधु सुजाति कुजाती॥
दानव देव ऊँच अरु नीचू।
अमिअ सुजीवनु माहुरु मीचू॥
माया ब्रह्म जीव जगदीसा।
लच्छि अलच्छि रंक अवनीसा॥
कासी मग सुरसरि क्रमनासा।
मरु मारव महिदेव गवासा॥
सरग नरक अनुराग बिरागा।
निगमागम गुन दोष बिभागा॥

अनुवाद (हिन्दी)

सुख-दुःख, पाप-पुण्य, दिवस-रात्र, साधू-असाधू, सुजाति-कुजाती, देव-दानव, उच्च-नीच, अमृत-विष, जीवन-मरण, माया-ब्रह्म, जीव-ईश्वर, संपत्ति-दारिद्रॺ, रंक-राजा, काशी-मगध, गंगा-कर्मनाशा (पापनदी), मारवाड-माळवा, ब्राह्मण-कसाई, स्वर्ग-नरक, अनुराग-वैराग्य या सर्व गोष्टी ब्रह्मदेवाच्या सृष्टीत आहेत. वेद-शास्त्रांनी गुण-दोषांनुसार त्यांचे विभाग केले आहेत.॥ ३-५॥

दोहा

मूल (दोहा)

जड़ चेतन गुन दोषमय बिस्व कीन्ह करतार।
संत हंस गुन गहहिं पय परिहरि बारि बिकार॥ ६॥

अनुवाद (हिन्दी)

विधात्याने या जड-चेतन सृष्टीला गुण-दोषमय बनविले आहे. परंतु संतरूपी हंस हे दोषरूपी पाणी टाळून त्यातील गुणरूपी दूधच ग्रहण करतात.॥ ६॥

मूल (चौपाई)

अस बिबेक जब देइ बिधाता।
तब तजि दोष गुनहिं मनु राता॥
काल सुभाउ करम बरिआईं।
भलेउ प्रकृति बस चुकइ भलाईं॥

अनुवाद (हिन्दी)

विधाता जेव्हा हंसासारखा विवेक देतो, तेव्हा दोष सोडून देऊन मन गुणांमध्ये अनुरक्त होते. काळाचा स्वभाव व कर्माच्या प्राबल्यामुळे कधी कधी थोर लोकसुद्धा मायेमुळे चांगुलपणापासून दूर जातात.॥ १॥

मूल (चौपाई)

सो सुधारि हरिजन जिमि लेहीं।
दलि दुख दोष बिमल जसु देहीं॥
खलउ करहिं भल पाइ सुसंगू।
मिटइ न मलिन सुभाउ अभंगू॥

अनुवाद (हिन्दी)

भगवंताचे भक्त हि चूक सुधारून आणि दुःख-दोष नाहीसे करून निर्मळ कीर्ती प्राप्त करतात; तसेच दुष्ट लोकसुद्धा कधी कधी उत्तम संगत लाभल्यावरही चांगले कार्य करतात, परंतु त्यांचा कधीही नाहीसा न होणारा मलिन स्वभाव नष्ट होत नाही.॥ २॥

मूल (चौपाई)

लखि सुबेष जग बंचक जेऊ।
बेष प्रताप पूजिअहिं तेऊ॥
उघरहिं अंत न होइ निबाहू।
कालनेमि जिमि रावन राहू॥

अनुवाद (हिन्दी)

जे मूलतः ठक आहेत, पण साधूसारखा वेष धारण करतात, त्यांच्या वरवर सोज्ज्वळ दिसणाऱ्या वेषामुळे जग त्यांची पूजा करते; परंतु केव्हा ना केव्हा ते उघडे पडतात. त्यांचे कपट शेवटपर्यंत टिकत नाही. जसे, कालनेमी, रावण आणि राहू यांचे झाले.॥ ३॥

मूल (चौपाई)

किएहुँ कुबेषु साधु सनमानू।
जिमि जग जामवंत हनुमानू॥
हानि कुसंग सुसंगति लाहू।
लोकहुँ बेद बिदित सब काहू॥

अनुवाद (हिन्दी)

वाईट वेष धारण केला, तरीही साधू-पुरुषाचा सन्मानच होतो, जसे जांबवान आणि हनुमानाचे झाले. वाईट संगतीमुळे नुकसान, तर चांगल्या संगतीमुळे लाभ होतो, हि गोष्ट जगामध्ये व वेदामध्ये सांगितली आहे आणि सर्वजण ती जाणतात.॥ ४॥

मूल (चौपाई)

गगन चढ़इ रज पवन प्रसंगा।
कीचहिं मिलइ नीच जल संगा॥
साधु असाधु सदन सुक सारीं।
सुमिरहिं राम देहिं गनि गारीं॥

अनुवाद (हिन्दी)

वाऱ्याच्या संगतीने धूळ उंच आकाशात पोहोचते आणि तीच नीच (खाली वहात जाणाऱ्या) पाण्याच्या संगतीमुळे चिखल बनते. साधू पुरुषाच्या घरातील पोपट-मैना या ‘राम-राम’ असे स्मरण करतात, तर दुष्टाच्या घरातील पोपट-मैना मोजून शिव्या देतात.॥ ५॥

मूल (चौपाई)

धूम कुसंगति कारिख होई।
लिखिअ पुरान मंजु मसि सोई॥
सोइ जल अनल अनिल संघाता।
होइ जलद जग जीवन दाता॥

अनुवाद (हिन्दी)

वाईटसंगतीमुळे धुराला काजळी म्हणतात, परंतु तोच धूर (सुसंगतीमुळे) सुंदर शाई होतो व पुराण लिहिण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि तोच धूर पाणी, अग्नि आणि वायू यांच्या संगतीने ढग बनून जगाला जीवन देणारा ठरतो.॥ ६॥

दोहा

मूल (दोहा)

ग्रह भेषज जल पवन पट पाइ कुजोग सुजोग।
होहिं कुबस्तु सुबस्तु जग लखहिं सुलच्छन लोग॥ ७ (क)॥

अनुवाद (हिन्दी)

ग्रह, औषध, पाणी, वायू आणि वस्त्र—हे सर्वच कुसंग आणि सुसंग लाभल्यामुळे वाईट व चांगले बनतात. विचारी पुरुषच हि गोष्ट जाणू शकतात.॥ ७(क)॥

मूल (दोहा)

सम प्रकास तम पाख दुहुँ नाम भेद बिधि कीन्ह।
ससि सोषक पोषक समुझि जग जस अपजस दीन्ह॥ ७ (ख)॥

अनुवाद (हिन्दी)

महिन्याच्या दोन्ही पंधरवडॺात प्रकाश आणि अंधार दोन्हीही सारखेच असतात. परंतु विधात्याने यांच्या नावात फरक केला आहे. (एकाचे नाव शुक्लपक्ष आणि दुसऱ्याचे नाव कृष्णपक्ष असे ठेवले.) एक पक्ष चंद्राला वाढविणारा आणि दुसरा चंद्राला घटविणारा समजून जगाने एकाला सुुकीर्ती व दुसऱ्याला अपकीर्ती दिली आहे.॥ ७ (ख)॥