०३ ब्राह्मण-संत-वंदन

मूल (चौपाई)

बंदउँ प्रथम महीसुर चरना।
मोह जनित संसय सब हरना॥
सुजन समाज सकल गुन खानी।
करउँ प्रनाम सप्रेम सुबानी॥

अनुवाद (हिन्दी)

सर्वांत प्रथम मी ब्राह्मणांच्या चरणांना वंदन करतो. कारण ते अज्ञानामुळे उत्पन्न होणाऱ्या सर्व संशयांचे निराकरण करतात. त्यानंतर मी सर्व गुणांची खाण असलेल्या संत-समाजाला प्रेमाने व सुंदर वाणीने प्रणाम करतो.॥ २॥

मूल (चौपाई)

साधु चरित सुभ चरित कपासू।
निरस बिसद गुनमय फल जासू॥
जो सहि दुख परछिद्र दुरावा।
बंदनीय जेहिं जग जस पावा॥

अनुवाद (हिन्दी)

संतांचे चरित्र हे कापसासारखे कल्याणकारक असते. कारण कापसाचे बोंड हे नीरस, स्वच्छ व गुणमय असते. तसेच संतां चेजीवन हे विषयासक्तिरहित असल्याने नीरस असते, कापूस हा पांढरा असतो, त्यासारखे संतांचे हृदयही अज्ञान व पापरूपी अंधकाराने रहित असते, म्हणून ते उजळ असते. कापसात गुण (तंतू) असतात, तसे संतांच्या हृदयात सद्गुणांचे भांडार असते, म्हणून ते गुणमय असते. (ज्याप्रमाणे कापसाचा धागा स्वतःला अर्पण करून सुईचे छिद्र झाकून टाकतो किंवा ज्याप्रमाणे कापूस हा पिंजणे, सूत कातणे आणि विणणे यांचे कष्ट सहन करून वस्त्राच्या रूपात परिणत होतो आणि दुसऱ्यांची गुह्ये झाकून टाकतो, त्याप्रमाणे) संत स्वतः दुःख सहन करून दुसऱ्यांची छिद्रे (दोष) झाकून टाकतो, त्यामुळे तो जगामध्ये वंदनीय कीर्ती प्राप्त करतो.॥ ३॥

मूल (चौपाई)

मुद मंगलमय संत समाजू।
जो जग जंगम तीरथराजू॥
राम भक्ति जहँ सुरसरि धारा।
सरसइ ब्रह्म बिचार प्रचारा॥

अनुवाद (हिन्दी)

संतांचासमुदाय हा आनंदमय आणि कल्याणमय होय. तो जगातील चालता-फिरता तीर्थराज प्रयागच होय. कारण तेथे राम-भक्तिरूपी गंगेचा प्रवाह आणि ब्रह्मविचाराच्या प्रचाराची सरस्वती असते.॥ ४॥

मूल (चौपाई)

बिधि निषेधमय कलिमल हरनी।
करम कथा रबिनंदनि बरनी॥
हरि हर कथा बिराजति बेनी।
सुनत सकल मुद मंगल देनी॥

अनुवाद (हिन्दी)

तसेच तेथे विधि-निषेधरूपी कर्मांची कहाणी हि कलियुगातील पापांचे हरण करणारी यमुना नदी असते आणि हरिहरांच्या कथा त्रिवेणी रूपाने शोभत असतात. ज्या ऐकताच संपूर्ण आनंद देऊन कल्याण करणाऱ्या असतात.॥ ५॥

मूल (चौपाई)

बटु बिस्वास अचल निज धरमा।
तीरथराज समाज सुकरमा॥
सबहि सुलभ सब दिन सब देसा।
सेवत सादर समन कलेसा॥

अनुवाद (हिन्दी)

(त्या संत-समाजरूपी तीर्थराज प्रयागावर) आपल्या धर्मावरील अढळ विश्वासरूप अक्षय वट आहे आणि शुभ-कर्मे हाच त्या तीर्थराजाचा परिवार होय. तो सर्व देशांमध्ये आणि सर्व काळांमध्ये सर्वांना सहज प्राप्त होऊ शकतो. त्याचे आदराने सेवन केल्यास तो सर्व क्लेशांचा नाश करणारा आहे.॥ ६॥

मूल (चौपाई)

अकथ अलौकिक तीरथराऊ।
देइ सद्य फल प्रगट प्रभाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

तो तीर्थराज हा अलौकिक आणि अवर्णनीय असून, तत्काळ फळ देणारा आहे. हा त्याचा प्रभाव प्रत्यक्ष दिसतो.॥ ७॥

दोहा

मूल (दोहा)

सुनि समुझहिं जन मुदित मन मज्जहिं अति अनुराग।
लहहिं चारि फल अछत तनु साधु समाज प्रयाग॥ २॥

अनुवाद (हिन्दी)

जी माणसे या संत-समाजरूपी तीर्थराजाचा प्रभाव आनंदित मनानेऐकून व समजून घेतात, तसेच त्यात प्रेमाने मग्न होतात, ते या मनुष्य देहात असतानाच धर्म, अर्थ, काम, मोक्ष—हे चारही पुरुषार्थ प्राप्त करतात.॥ २॥

मूल (चौपाई)

मज्जन फल पेखिअ ततकाला।
काक होहिं पिक बकउ मराला॥
सुनि आचरज करै जनि कोई।
सतसंगति महिमा नहिं गोई॥

अनुवाद (हिन्दी)

या तीर्थराजातील स्नानाचे तत्काळ फळ म्हणजे त्यायोगे कावळे कोकीळ बनतात आणि बगळे हंस बनतात. हे ऐकून कोणीही आश्चर्य करू नये; कारण सत्संगतीची महती कधी लपून रहात नाही.॥ १॥

मूल (चौपाई)

बालमीक नारद घट जोनी।
निजनिजमुखनिकहीनिज होनी॥
जलचर थलचर नभचर नाना।
जे जड़ चेतन जीव जहाना॥

अनुवाद (हिन्दी)

(याला पुरावा म्हणजे स्वतः) वाल्मीकी, नारद आणि अगस्त्य यांनी स्वतःच्या मुखाने आपला जीवन-वृत्तांत सांगितलेला आहे. या जगात जे जलचर, स्थलचर, गगनचर तसेच नाना प्रकारचे जड-चेतन असे जीव आहेत,॥ २॥

मूल (चौपाई)

मति कीरति गति भूति भलाई।
जब जेहिं जतन जहाँ जेहिं पाई॥
सो जानब सतसंग प्रभाऊ।
लोकहुँ बेद न आन उपाऊ॥

अनुवाद (हिन्दी)

त्यांपैकी ज्यांनी, ज्या वेळी, जेथे, ज्या प्रयत्नाने, बुद्धी, कीर्ती, सद्गती, विभूती (ऐश्वर्य) आणि मोठेपणा मिळविला आहे, तो सर्वच सत्संगाचा प्रभाव समजला पाहिजे. वेदांमध्ये आणि या लोकामध्ये हे सर्व प्राप्त होण्यासाठी सत्संगाशिवाय दुसरा कोणताही उपाय सापडत नाही.॥ ३॥

मूल (चौपाई)

बिनु सतसंग बिबेक न होई।
राम कृपा बिनु सुलभ न सोई॥
सतसंगत मुद मंगल मूला।
सोइ फल सिधि सब साधन फूला॥

अनुवाद (हिन्दी)

सत्संगाशिवाय विवेक येत नाही आणि श्रीरामांच्या कृपेशिवाय सत्संग सहजपणे मिळत नाही. सत्संगती हि आनंद आणि कल्याणाचे मूळ आहे. सत्संगाची प्राप्ती हेच फळ असून सर्व साधने हि फुले होत.॥ ४॥

मूल (चौपाई)

सठ सुधरहिं सतसंगति पाई।
पारस परस कुधात सुहाई॥
बिधि बस सुजन कुसंगत परहीं।
फनि मनि सम निज गुन अनुसरहीं॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंड हे सुंदर सोने बनते, त्याप्रमाणे दुष्ट लोकही सत्संगती मिळाल्यावर सुधारतात. दैवयोगाने जर कधी सज्जन मनुष्य वाईट संगतीत पडले तर तेथेही ते सर्पाच्या मण्याप्रमाणे आपल्या गुणांचेच अनुसरण करतात. (अर्थात् ज्याप्रमाणे सापाची संगत असूनही मणी त्याचे विष घेत नाही आणि तो आपला सहज गुण असलेला प्रकाश सोडत नाही, त्याप्रमाणे साधू पुरुष दुष्टांच्या संगतीत राहूनही दुसऱ्यांना प्रेम देतात. त्यांच्यावर दुष्टांचा कोणताही दुष्परिणाम होत नाही.)॥ ५॥

मूल (चौपाई)

बिधि हरि हर कबि कोबिद बानी।
कहत साधु महिमा सकुचानी॥
सो मो सन कहि जात न कैसें।
साक बनिक मनि गुन गन जैसें॥

अनुवाद (हिन्दी)

ब्रह्मदेव, विष्णू, शिव, कवी व पंडित यांची वाणीसुद्धा संत-महिमा गाताना कुंठित होते, मग मला त्या संतांच्या महिम्याचे वर्णन कसे करता येणार? भाजीपाला विकणारा रत्नांच्या गुणांचे वर्णन काय करणार?॥ ६॥

दोहा

मूल (दोहा)

बंदउँ संत समान चित हित अनहित नहिं कोइ।
अंजलि गत सुभ सुमन जिमि सम सुगंध कर दोइ॥ ३ (क)॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांच्या मनात समता असते, ज्यांचा कोणी मित्र नसतो, की शत्रू नसतो, त्या संतांना मी प्रणाम करतो. ओंजळीत ठेवलेली फुले (ज्या हाताने फुले तोडली आणि ज्या हातात ती ठेवली त्या) दोन्हीही हातांना सारखीच सुगंधित करतात. (त्याप्रमाणेच संत हे शत्रू व मित्र दोघांचेही सारखेच कल्याण करतात.)॥ ३(क)॥

मूल (दोहा)

संत सरल चित जगत हित जानि सुभाउ सनेहु।
बालबिनय सुनि करि कृपा राम चरन रति देहु॥ ३(ख)॥

अनुवाद (हिन्दी)

संत हे सरळ मनाचे आणि जगाचे हित करणारे असतात, त्यांचा हा स्वभाव व स्नेह जाणून मी त्यांना प्रार्थना करतो की, मज बालकाची प्रार्थना ऐकून व कृपा करून त्यांनी श्रीरामांच्या चरणी मला प्रेम द्यावे.॥ ३(ख)॥