०१ मंगलाचरण

Misc Detail

श्लोक

मूल (दोहा)

वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि।
मङ्गलानां च कर्त्तारौ वन्दे वाणीविनायकौ॥ १॥

अनुवाद (हिन्दी)

अक्षरे, अर्थसमूह, रस, छंद आणि मंगल यांची निर्मिती करणाऱ्या श्रीसरस्वती व श्रीगणेश यांना मी वंदन करतो.॥ १॥

मूल (दोहा)

भवानीशङ्करौ वन्दे श्रद्धाविश्वासरूपिणौ।
याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धाः स्वान्तःस्थमीश्वरम्॥ २॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांच्याशिवाय सिद्धजन अंतःकरणात असलेल्या ईश्वराला पाहू शकत नाहीत, अशा श्रद्धा व विश्वासस्वरूप असलेल्या पार्वती व शंकर यांना मी वंदन करतो.॥ २॥

मूल (दोहा)

वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणम्।
यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वन्द्यते॥ ३॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांच्या आश्रित असल्यामुळे वाकडा चंद्रसुद्धा सर्वत्र वंदनीय ठरतो, अशाज्ञानमय, शंकररूपी गुरूंना मी नित्य वंदन करतो.॥ ३॥

मूल (दोहा)

सीतारामगुणग्रामपुण्यारण्यविहारिणौ।
वन्दे विशुद्धविज्ञानौ कवीश्वरकपीश्वरौ॥ ४॥

अनुवाद (हिन्दी)

श्रीसीतारामांच्या गुणसमूहरूपी पवित्र वनात विहार करणाऱ्या, विशुद्ध विज्ञानसंपन्न असणाऱ्या कवीश्वर वाल्मीकी व कपीश्वर हनुमान यांना मी वंदन करतो.॥ ४॥

मूल (दोहा)

उद्भवस्थितिसंहारकारिणीं क्लेशहारिणीम्।
सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभाम्॥ ५॥

अनुवाद (हिन्दी)

जी उत्पत्ती, स्थिती आणि संहार करते, क्लेश हरण करते, तसेच संपूर्ण कल्याण करते, त्या श्रीरामचंद्रांची प्रियतमा असलेल्या श्रीसीता-देवींना मी नमस्कार करतो.॥ ५॥

मूल (दोहा)

यन्मायावशवर्त्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा
यत्सत्त्वादमृषैव भाति सकलं रज्जौ यथाहेर्भ्रमः।
यत्पादप्लवमेकमेव हि भवाम्भोधेस्तितीर्षावतां
वन्देऽहं तमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरिम्॥ ६॥

अनुवाद (हिन्दी)

संपूर्ण विश्व, ब्रह्मादी देव आणि असुर हे ज्यांच्या मायेच्या अधीन आहेत, दोरीवर साप असल्याचा भास होतो, त्याप्रमाणे ज्यांच्या सत्तेमुळे हे संपूर्ण दृश्य जग सत्यच वाटते आणि ज्यांचे केवळ चरण हेच भवसागरातून तरून जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी एकमात्र नौका आहेत, अशा संपूर्ण कारणांचेही श्रेष्ठ कारण असलेल्या आणि ज्यांना श्रीराम म्हटले जाते, त्या भगवान श्रीहरींना मी वंदन करतो.॥ ६॥

मूल (दोहा)

नानापुराणनिगमागमसम्मतं यद्
रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि।
स्वान्तःसुखाय तुलसी रघुनाथगाथा-
भाषानिबन्धमतिमञ्जुलमातनोति॥ ७॥

अनुवाद (हिन्दी)

अनेक पुराणे, वेद आणि तंत्रशास्त्र यांना संमत असलेले जे वर्णन रामायणात आले आहे ते, तसेच श्रीरघुनाथांच्या इतरत्र उपलब्ध असलेल्या कथा यांचा तुलसीदास स्वतःच्या आनंदासाठी अत्यंत मनोहर अशा लोकभाषेमध्ये विस्तार करीत आहे.॥ ७॥

सोरठा

मूल (दोहा)

जो सुमिरत सिधि होइ गन नायक करिबर बदन।
करउ अनुग्रह सोइ बुद्धि रासि सुभ गुन सदन॥ १॥

अनुवाद (हिन्दी)

ज्याच्या स्मरणाने सर्व कार्ये सिद्ध होतात, जो गणांचा स्वामी, सुंदर गजमुख, बुद्धीचे भांडार व पवित्र गुणांचा आश्रय आहे, असा श्रीगजानन माझ्यावर कृपा करो.॥ १॥

मूल (दोहा)

मूक होइ बाचाल पंगु चढ़इ गिरिबर गहन।
जासु कृपाँ सो दयाल द्रवउ सकल कलि मल दहन॥ २॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांच्या कृपा-प्रसादामुळे मुका बोलू लागतो आणि लंगडा दुर्गम पर्वतावर चढतो, असे ते कलियुगातील सर्व पापे जाळून टाकणारे दयाळू भगवान माझ्यावर कृपा करोत.॥

मूल (दोहा)

नील सरोरुह स्याम तरुन अरुन बारिज नयन।
करउ सो मम उर धाम सदा छीरसागर सयन॥ ३॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांचा वर्ण निळॺा कमळासारखा सावळा आहे, ज्यांचे नेत्र फुललेल्या लाल कमळासारखे आहेत आणि जे नेहमी क्षीरसागरामध्ये शयन करतात, ते भगवान नारायण माझ्या हृदयात निवास करोत.॥३॥

मूल (दोहा)

कुंद इंदु सम देह उमा रमन करुना अयन।
जाहि दीन पर नेह करउ कृपा मर्दन मयन॥ ४॥

अनुवाद (हिन्दी)

ज्यांचे अंग कुंदपुष्पाप्रमाणे व चंद्राप्रमाणे गौर वर्णाचे आहे, जे पार्वतीचे प्रियतम आणि दयेचा सागर आहेत, ज्यांचे दिनांवर प्रेम आहे व जे कामदेवाला भस्म करणारे आहेत, अशा शंकरांनी माझ्यावर कृपा करावी.॥ ४॥