०५ गोस्वामी तुलसीदासांचे संक्षिप्त जीवन

अनुवाद (हिन्दी)

प्रयागजवळ चित्रकूट जिल्ह्यात राजापूर नावाचे एक गाव आहे, तेथे आत्माराम दुबे नावाचे एक प्रतिष्ठित सरयूपारीण ब्राह्मण रहात होते. त्यांच्या पत्नीचे नाव होते हुलसी. विक्रम संवत् १५५४ च्या श्रावण शुक्ल सप्तमीच्या दिवशी अभुक्त मूळ नक्षत्रावर या भाग्यवान दांपत्याच्या घरी बारा महिने गर्भात राहिल्यावर गोस्वामी तुलसीदासांचा जन्म झाला. जन्मल्यावर बालक तुलसीदास रडले नाहीत. परंतु त्यांच्या मुखातून ‘राम’ हा शब्द निघाला. जन्मतः त्यांच्या तोंडात बत्तीस दात होते. त्यांची ठेवण पाच वर्षांच्या मुलासारखी होती. अशा प्रकारचे अद्भुत बालक पाहून पित्याला अमंगल घडण्याच्या शंकेने भीती वाटू लागली आणि तो त्याविषयी अनेक प्रकारच्या कल्पना करू लागला. माता हुलसीलाही हे पाहून काळजी वाटू लागली. तिने बालकाचे अनिष्ट होईल, या शंकेमुळे दशमी दिवशी रात्री त्या नवजात शिशूला आपल्या दासीबरोबर तिच्या सासरी पाठविले आणि दुसऱ्या दिवशी स्वतः तिने जगाचा निरोप घेतला. चुनिया नावाच्या त्या दासीने मोठॺा प्रेमाने बालकाचे पालन-पोषण केले. जेव्हा तुलसीदास जवळपास साडे पाच वर्षांचे झाले, तेव्हा चुनियाचाही मृत्यू झाला. आता तो बालक अनाथ झाला. तो दारोदार भटकू लागला. त्यावेळी जगज्जननी पार्वतीला त्या होतकरू मुलाची दया आली. ती ब्राह्मण स्त्रीचा वेष घेऊन रोज त्याच्याजवळ जाई आणि त्याला आपल्या हातांनी जेवू घाली.
इकडे भगवान शंकरांच्या प्रेरणेने रामशैलावर राहणाऱ्या श्रीअनंतानंद यांचे प्रिय शिष्य श्रीनरहर्यानंद यांनी त्या बालकाचा शोध घेतला आणि तेथे वि. संवत् १५६१ च्या माघ शुक्ल पंचमी, शुक्रवारच्या दिवशी त्याची मुंज केली. न शिकवताच त्या ‘रामबोला’ बालकाने गायत्री मंत्राचे उच्चारण केले. ते पाहून सर्व लोक चकित झाले. यानंतर नरहरी स्वामींनी वैष्णवांचे पाच संस्कार करून त्या रामबोलाला राममंत्राची दीक्षा दिली आणि अयोध्येमध्ये राहून ते त्याला विद्या शिकवू लागले. बालक रामबोलाची बुद्धी मोठी प्रखर होती. एकदा गुरुमुखातून आलेले जे तो ऐके, ते त्याला तोंडपाठ होत असे. काही दिवसांनंतर गुरु-शिष्य तेथून शूकरक्षेत्र (सोरों) येथे गेले. तेथे श्रीनरहरीने तुलसीदासांना रामचरित्र ऐकविले. काही दिवसांनंतर ते काशीला गेले. काशीमध्ये शेषसनातन यांच्याजवळ राहून तुलसीदासांनी पंधरा वर्षे वेद व वेदांगांचे अध्ययन केले. इकडे त्यांच्या मनात प्रपंचवासना जागी झाली आणि विद्यागुरूंची आज्ञा घेऊन ते आपल्या जन्मभूमीला आले. तेथे आल्यावर त्यांना दिसले की, त्यांच्या कुटुंबाची वाताहत झालेली आहे. त्यांनी विधिपूर्वक आपल्या पिता इत्यादींचे श्राद्ध केले आणि ते तेथेच राहून लोकांना भगवान श्रीरामांची कथा सांगू लागले.
वि. संवत् १५८३ च्या ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीला गुरुवारी भारद्वाज गोत्राच्या एका सुंदर मुलीबरोबर त्यांचा विवाह झाला आणि ते सुखाने आपल्या नवविवाहित पत्नीबरोबर नांदू लागले. एकदा त्यांची पत्नी आपल्या भावाबरोबर आपल्या माहेरी गेली. तुलसीदासही तिच्या मागोमाग तेथे गेले. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांचा फार धिक्कार केला. ती म्हणाली, ‘माझ्या या हाडा-मांसाच्या शरीराची तुम्हांला इतकी आसक्ती आहे, तिच्या निम्म्यानेही जर भगवंतांबद्दल आसक्ती असती, तर तुमचा उद्धार झाला असता.’
तुलसीदासांच्या मनाला हे शब्द लागले. ते एक क्षणही तेथे थांबले नाहीत. लगेच तेथून निघाले.
तुलसीदास प्रयागला आले. तेथे त्यांनी गृहस्थाचा वेष टाकून साधूचा वेष धारण केला. नंतर तीर्थाटन करीत ते काशीला पोहोचले. मानससरोवराजवळ त्यांना काकभुशुंडींचे दर्शन झाले.
काशीमध्ये तुलसीदास रामकथा सांगू लागले. तेथे त्यांना एक दिवस एक भूत भेटले. त्याने त्यांना हनुमानाचा पत्ता सांगितला. तुलसीदासांनी हनुमानाला भेटून श्रीरघुनाथांचे दर्शन घडविण्याची विनंती केली. हनुमान म्हणाला, ‘तुला चित्रकूटावर श्रीरघुनाथांचे दर्शन होईल.’ मग तुलसीदास चित्रकूटाकडे गेले.
चित्रकूटाला पोहोचल्यावर रामघाटावर त्यांनी मुक्काम केला. एक दिवस ते प्रदक्षिणा घालण्यास निघाले होते. वाटेत त्यांना श्रीरामांचे दर्शन झाले. दोन फार सुंदर राजकुमार घोडॺावर बसून धनुष्य-बाण धारण करून जात असल्याचे त्यांना दिसले. तुलसीदास त्यांना पाहून मुग्ध होऊन गेले, परंतुते त्यांना ओळखू शकले नाहीत. नंतर हनुमानाने येऊन त्यांना ते सर्व रहस्य सांगितले, तेव्हा त्यांना पश्चात्ताप वाटू लागला. हनुमानाने त्यांचे सांत्वन केले व उद्या प्रातःकाली पुन्हा दर्शन होईल, असे सांगितले.
वि. संवत् १६०७ च्या मौनी अमावास्येला बुधवारी त्यांच्यासमोर भगवानश्रीराम पुन्हा प्रकट झाले. त्यांनी बालरूपामध्ये तुलसीदासांना सांगितले की, ‘बाबा, आम्हांला चंदन द्या.’ इकडे हनुमानाने विचार केला की, तुलसीदासांना यावेळी तरी भ्रम होऊ नये. म्हणून त्याने पोपटाचे रूप धारण करून दोहा म्हटला की,

मूल (श्लोक)

चित्रकूट के घाट पर भइ संतन की भीर।
तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुबीर॥

अनुवाद (हिन्दी)

तुलसीदास त्या अद्भुत बालरूपाचे लावण्य पाहून देहभान विसरले. भगवंतांनी आपल्या हाताने चंदन घेऊन आपल्या व तुलसीदासांच्या मस्तकाला लावले व ते अंतर्धान पावले.
वि. संवत् १६२८ मध्ये ते हनुमानाच्या आज्ञेप्रमाणे अयोध्येकडे निघाले. त्याकाळी प्रयागामध्ये माघमेळा चालू होता. पर्वाच्या सहाव्या दिवसानंतर एका वटवृक्षाखाली त्यांना भरद्वाज व याज्ञवल्क्य मुनींचे दर्शन झाले. त्यांनी सूकर क्षेत्रामध्ये आपल्या गुरूकडून ऐकलेली तीच रामकथा तेथे त्यावेळी चालली होती. नंतर ते काशीला आले आणि तेथे प्रह्लाद घाटावर एका ब्राह्मणाच्या घरी ते राहिले. तेथे त्यांच्यामध्ये कवित्वशक्तीचे स्फुरण झाले आणि ते संस्कृतमध्ये पद्य-रचना करू लागले. परंतु ते दिवसा जितकी पद्ये रचत, ती रात्री लुप्त होत. असे रोज घडे. आठव्या दिवशी तुलसीदासांना स्वप्न पडले. भगवान शंकरांनी त्यांना आज्ञा केली की, तू आपल्या लोकभाषेत काव्य-रचना कर. तुलसीदासांना जाग येऊन उठून बसले. त्यावेळी भगवान शिव आणि पार्वती त्यांच्यासमोर प्रकट झाले. तुलसीदासांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. शिव म्हणाले, ‘तू अयोध्येला जाऊन रहा आणि लोकभाषेत काव्य-रचना कर. माझ्या आशीर्वादाने तुझे काव्य सामवेदाप्रमाणे पूज्य होईल.’ असे म्हणून गौरीशंकर अंतर्धान झाले. त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून तुलसीदास काशीहून अयोध्येला आले.
वि. संवत् १६३१ ला रचनेचा प्रारंभ झाला. त्या साली रामनवमीला अगदी तसाच योग होता, जसा त्रेतायुगात रामजन्मादिवशी होता. त्या दिवशी प्रातःकाळी तुलसीदासांनी श्रीरामचरितमानसाची रचना प्रारंभ केली. दोन वर्षे, सात महिने आणि सव्वीस दिवसांनी ग्रंथाची समाप्ती झाली. वि. संवत् १६३३ मध्ये मार्गशीर्ष शुक्ल पक्षात रामविवाहाच्या दिवशी सातही कांडे पूर्ण झाली.
यानंतर भगवंताच्या आज्ञेने तुलसीदास काशीला आले. तेथे त्यांनी भगवान विश्वनाथ आणि अन्नपूर्णामातेला श्रीरामचरित मानस ऐकवले. ग्रंथ त्या रात्री विश्वनाथाच्या मंदिरात ठेवला होता. सकाळी जेव्हा द्वार उघडले तेव्हा त्याच्यावर लिहिलेले दिसले—‘सत्यं शिवं सुंदरम्’ आणि त्याखाली भगवान शंकरांची सही होती. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी ‘सत्यं शिवं सुंदरम्’ असा आवाज ऐकला.
इकडे पंडितांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा त्यांच्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाली. ते गोळा होऊन तुलसीदासांची निंदा करू लागले आणि तो ग्रंथ नष्ट करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांनी ग्रंथ चोरण्यासाठी दोन चोर पाठविले. चोरांना तेथे दिसले की, तुलसीदासांच्या कुटीजवळ दोन वीर पुरुष धनुष्यबाण घेऊन पहारा देत आहेत. ते मोठे सुंदर श्याम व गौर वर्णाचे होते. त्यांच्या दर्शनाने चोरांची बुद्धी पालटून ती शुद्ध झाली. त्या वेळेपासून त्यांनी चोरी करणे सोडून दिले. व ते भगवंतांच्या भजनास लागले. आपल्यासाठी भगवंतांना त्रास झाला, असे वाटून तुलसीदासांनी आपल्या कुटीतील सर्व सामान लुटून टाकले आणि तो ग्रंथ आपला मित्र तोडरमल यांच्याकडे ठेवला. त्यानंतर त्यांनी दुसरी प्रत लिहिली. तिच्याच आधारे दुसऱ्या नकला तयार केल्या जाऊ लागल्या. ग्रंथाचा प्रचार दिवसेंदिवस वाढू लागला.
इकडे पंडितांनी दुसरा काही उपाय न दिसल्यामुळे त्या वेळचे काशीतील महान पंडित श्रीमधुसूदन सरस्वती यांना तो ग्रंथ पहाण्यास प्रवृत्त केले. श्रीमधुसूदन सरस्वती यांना तो पाहून खूप प्रसन्नता वाटली आणि त्याच्यावर आपली संमती लिहिली की-

मूल (श्लोक)

आनन्दकानने ह्यस्मिञ्जङ्गमस्तुलसीतरुः।
कवितामञ्जरी भाति रामभ्रमरभूषिता॥

अनुवाद (हिन्दी)

(या काशीरूपी आनंदवनात तुलसीदास हे चालते-फिरते तुलसीचे रोपटे आहेत. त्यांची कवितारूपी मञ्जरी फारच सुंदर आहे. तिच्यावर श्रीरामरूपी भ्रमर नेहमी घोटाळत असतात.)
एवढॺावरही पंडितांचे समाधान झाले नाही. तेव्हा ग्रंथाची परीक्षा करण्यासाठी त्यांनी आणखी एक उपाय करण्याचे ठरविले. भगवान विश्वनाथांसमोर वेद, त्याखाली शास्त्रे, शास्त्रांच्या खाली पुराणे आणि सर्वांखाली रामचरितमानस ठेवले. मंदिर बंद करून ठेवले. सकाळी जेव्हा मंदिर उघडले, तेव्हा लोकांना दिसलेकी, रामचरितमानस हे वेदांच्या वरती ठेवलेले आहे. आता ते पंडित फार ओशाळले. त्यांनी तुलसीदासांची क्षमा मागितली आणि भक्तिभावाने त्यांचे चरणोदक घेतले.
आता तुलसीदास असिघाटावर राहू लागले. एके दिवशी रात्री कलियुग मूर्तरूप धारण करून त्यांच्याजवळ आले आणि त्यांना त्रास देऊ लागले. तेव्हा तुलसीदासांनी हनुमानाचे ध्यान केले. हनुमानाने त्यांना विनयाची पदे रचण्यास सांगितले. मग गोस्वामींनी ‘विनय-पत्रिका’ लिहिली आणि ती भगवंतांच्या चरणी अर्पण केली.श्रीरामांनी स्वतः तिच्यावर आपली सही केली आणि तुलसीदासांना निर्भय केले.
वि. संवत् १६८० श्रावण कृष्ण तृतीयेला शनिवारी असिघाटावर गोस्वामींनी ‘राम राम’ असे म्हणत शरीर त्याग केला.
(टीप- विक्रम संवत् मधून ५६ वजा केले असता इसवीसन वर्ष येते. वि.सं.चा प्रारंभ शालिवाहन शकाच्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला होतो.)