०१ निवेदन

अनुवाद (हिन्दी)

श्रीरामचरितमानस या ग्रंथाचे स्थान हिंदी साहित्यातच नव्हे, तर विश्व-साहित्यामध्ये आगळे-वेगळे आहे. याच्या तोडीचा असाच सर्वांग-सुंदर, उत्तम काव्य-लक्षणांनी युक्त, साहित्यातील सर्व रसांचा आस्वाद देणारा, काव्यकलेच्या दृष्टीनेसुद्धा सर्वोच्च कोटीचा तसेच आदर्श गार्हस्थ्य-जीवन, आदर्श राजधर्म, कौटुंबिक जीवन, आदर्श पातिव्रत्य धर्म, आदर्श भ्रातृधर्माबरोबर सर्वोच्च भक्ती, ज्ञान, त्याग, वैराग्य तसेच सदाचाराची शिकवण देणारा, आबालवृद्ध, स्त्री-पुरुषांना, सारखाच उपयोगी आणि सगुण साकार भगवंताची आदर्श मानव-लीला व त्यांचे गुण, प्रभाव, रहस्य आणि प्रेमाचे गहन तत्त्व अत्यंत सरळ, मनोहर आणि ओजस्वी शब्दांमध्ये व्यक्त करणारा दुसरा ग्रंथ हिंदी भाषेमध्येच नव्हे, तर कदाचित जगातील कोणत्याही भाषेत आजपर्यंत लिहिलेला नसावा. याच कारणामुळे जितक्या आवडीने गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित, गृहस्थ-संन्यासी, स्त्री-पुरुष, बालक-वृद्ध इत्यादी सर्व वर्गांतील लोक हा ग्रंथराज वाचतात, तितक्या आवडीने अन्य कोणताही ग्रंथ वाचत नसावेत. भक्ती, ज्ञान, नीती, सदाचार यांचा जितका प्रचार या ग्रंथामुळे जनतेत झालेला आहे, तेवढा कदाचित इतर कोणत्याही ग्रंथाने झालेला नाही. मॉरिशस, फिजी इत्यादी परदेशातही या ग्रंथाचा प्रचार आहे.
ज्या ग्रंथाचा जगात इतका मान आहे, त्याच्या अनेक आवृत्त्या छापल्या जाणे व त्यावर अनेक टीका लिहिल्या जाणे हेही स्वाभाविकच आहे. म्हणूनच श्रीरामचरितमानसाच्या आजपर्यंत शेकडो आवृत्त्या छापल्या गेल्या आहेत. यावर शेकडो टीकासुद्धा लिहिल्या गेल्या आहेत. याच्या पाठासंबंधीही रामायणाच्या विद्वानांमध्ये खूप मतभेद आहेत. इतकेच काय, कित्येक ठिकाणी प्रत्येक चौपाईमध्ये एक ना एक पाठभेदही विभिन्न आवृत्त्यांमध्ये दिसून येतात. जितके पाठ-भेद या ग्रंथामध्ये दिसून येतात, तितके कदाचित इतर कोणत्याही प्राचीन ग्रंथामध्ये दिसून येत नाहीत. यावरून या ग्रंथाची विशेष लोकप्रियतासिद्ध होते.
याशिवाय रामचरितमानस हा एक आशीर्वादात्मक ग्रंथ आहे. श्रद्धाळू लोक यामधील पद्यांचा मंत्रवत आदर करतात आणि याच्या पाठाने लौकिक आणि पारमार्थिक अनेक कार्ये सिद्ध करून घेतात. इतकेच काय, याचे श्रद्धेने पारायण केल्याने आणि यात असलेल्या उपदेशांचे विचारपूर्वक मनन केल्याने, तसेच त्यानुसार आचरण केल्याने व यात वर्णन केलेल्या भगवंतांच्या मधुर लीलेंचे चिंतन आणि कीर्तन केल्याने मोक्षरूप परम पुरुषार्थ व त्यापेक्षाही अधिक भगवत्प्रेमाचा लाभ सहजरीत्या मिळू शकतो. ज्या ग्रंथाची रचना गोस्वामी तुलसीदास यांच्यासारख्या अनन्य भगवद्भक्ताकडून झालेली आहे, त्यांनी भगवान श्रीसीताराम यांच्या कृपेने भगवंतांच्या दिव्य लीलेंचा प्रत्यक्ष अनुभव घेऊनच यथार्थ वर्णन केले आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीगौरीशंकर यांच्या आज्ञेने ज्याची रचना झाली आहे, त्या ग्रंथाचा अशा प्रकारचा अलौकिक प्रभाव असणे, यात आश्चर्य ते काय? अशा अवस्थेमध्ये या अलौकिक ग्रंथाचा जितका प्रचार केला जाईल, त्याचे जितके अधिक पठन-पाठन आणि मनन-अनुशीलन होईल, तितके जगाचे कल्याण होईल, यात जरासुद्धा संदेह नाही. जगामध्ये सुखशांती व प्रेम यांचा प्रसार करण्यासाठी आणि भगवत्कृपेचा जीवनात अनुभव घेण्यासाठी रामचरितमानसाचे पठन व अनुशीलन करणे आवश्यक आहे.
पाठ व अर्थ यांमधील त्रुटींबद्दल आम्ही आपल्या विद्वान वाचकांची क्षमा मागतो, आणि हि भगवंतांची वस्तू विनम्र भावनेने भगवंतांच्याच चरणी अर्पण करतो.